Connect with us

गावागावातुन

धामणी (ता.आंबेगाव) येथे श्री खंडोबा,म्हाळसाईचा शाही विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न.

Published

on

लोणी धामणी प्रतिनिधी

पौष पौर्णिमेला श्री म्हाळसाकांत खंडोबा व म्हाळसाई देवीचा लग्न सोहळा धामणी ( ता.आंबेगाव) येथे पारंपारिक वाद्याच्या गजरात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत थाटात पार पडला.सोमवारी (दि.१३) पौष पौर्णिमेनिमित्त पहाटे धामणीच्या खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती करण्यात आली.त्यानंतर सेवेकरी धोंडीबा भगत,दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,प्रभाकर भगत,शांताराम भगत,दिनेश जाधव,माऊली जाधव वाघे,सिताराम जाधव वाघे.,राजेश भगत,पांडुरंग भगत,राहुल भगत यांनी व महिला भाविकांनी स्वयंभू सप्तशिवलिंगाला व सर्वांगसुंदर खंडोबा व म्हाळसाईच्या मुखवट्याला चंदन उटीचा लेप दिला.

त्यावर सुंगधी दवणाच्या अत्तरात मिश्रित केलेली हळद लावण्यात आली.यावेळी देवाला हळद लावण्यासाठी महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.यावेळी महाळुंगे पडवळ,गावडेवाडी,लांडेवाडी,तळेगांव ढमढेरे,लोणी,खडकवाडी,रानमळा, पाबळ,अवसरी खुर्द,संविदणे येथील मानकरी व भाविक उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता बाळासाहेब महादू बढेकर,विठ्ठल बढेकर,अंकुश बढेकर यांच्या मानाच्या मांडवडहाळ्याची पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येऊन सजवलेल्या बैलगाड्यातील मांडवडहाळे मंदिरात सदानंदाचा येळकोट करून व भंडार्‍याची उधळण करुन देवाला अर्पण करण्यात आले.श्री म्हाळसाकांत खंडोबा व म्हाळसाईदेवी यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती.मंदिरात देवाला पूजा करुन खंडोबाला व म्हाळसाईला बांशिग व मुडावळ्या घालण्यात आल्या.पेठेतील मुक्ताबाई मंदिरात पौष महिण्याच्या पालखीचे मानकरी समस्त करंजखेले मंडळीच्या हस्ते आरती करण्यात आल्यानंतर दुपारी सेवेकरी मंडळीनी मंदिरातील पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याला बाशींग व मुडावळ्या बांधून मुखवटा पालखीत ठेवल्यानंतर पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूकीला सुरुवात झाली.

पौष महिण्यातील शाकंभरी पौष पौर्णिमेच्या पालखीचा पारंपारिक मान समस्त करंजखेले मळ्याला असतो.मिरवणूकीत करंजखेले,कदम,करंडे,सांडभोर वाळूंज आडनावाचे भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झालेले होते.महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.मिरवणूकीत महिलांनी फुगडी खेळून मिरवणूकीला रंगत आणली.मिरवणूकीत खंडोबाचे वाहन असलेला रुबाबदार अश्व (घोडा)सामील झालेला होता.यावेळी मिरवणूकीत पालखीवर फुलाच्या पाकळ्या,अक्षदा व भंडारा उधळण्यात येत होती.फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.पालखीची मिरवणूक सायंकाळी पावणेपाच वाजता मंदिरात विसावली.मंदिराच्या आवारात देवाच्या लग्न सोहळ्यासाठी आकर्षक मंडपातील सजवलेल्या स्टेजवर नवरदेव म्हाळसाकांत खंडोबाचे महिलांनी ओवाळणी करुन स्वागत केले.त्यानंतर सनई व तुतारीच्या निनादात खंडोबाचा मुखवटा स्टेजवर आणण्यात आला.त्यानंतर सेवेकरी मंडळीनी मुख्य मंदिरातून बांशिंग व मुडावळ्या घातलेल्या व हिरवी साडी परिधान केलेला म्हाळसाईचा मुखवटा मंडपात आणला. सांयकाळी ५ वाजता खंडोबा म्हाळसाईच्या विवाह सोहळ्याला सुरुवात झाली.पाच मंगलाष्टकाच्या गजरात फुलांच्या पाकळ्या व अक्षता भंडारा उधळून वाद्याच्या निनादात व फटाक्याच्या आतषबाजीत सदानंदाचा येळकोट करुन खंडोबा म्हाळसाईचा विवाह सोहळा पार पडला.

त्यानंतर उपस्थित वर्‍हाडी मंडळीना मोतीचूर लाडूचा प्रसाद देण्यात आला.शाही विवाह सोहळ्याचे पौरोहित्य प्रमोद देखणे,बाळू बेरी, मुकुंद क्षिरसागर यांनी केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

Published

on

मंचर-

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

 पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत. 

    निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
Continue Reading

गावागावातुन

शिळा बाजार” ठरतोय वळती गावच्या सांस्कृतिक ओळखीचा भागयंदा शिळ्या बाजारात झाली लाखोंची उलाढाल.

Published

on

पारगाव :

वळती (ता.आंबेगाव) गावात स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली शिळ्या बाजाराची ही परंपरा पिढ्यान्‌पिढ्या जपत ग्रामस्थांनी आजपर्यंत टिकवून ठेवली आहे. आधुनिक काळातही गावच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असलेला हा शिळा बाजार वळती गावाची खास ओळख ठरत आहे. परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक सलोखा जपत भरवला जाणारा हा शिळा बाजार पाहण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिकही आवर्जून उपस्थित राहत आहेत.


पौष पौर्णिमेला नागापूर येथील थापलिंग गडावर दोन दिवस खंडोबा देवाची यात्रा भरते. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी वळती गावात हा शिळा बाजार भरतो. पूर्वीचा काळी वळती, नागापूर या दोन गावांची वळती ग्रामपंचायत एकच होती. त्यामुळे थापलिंग देवस्थान हे वळती ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत होते. त्यावेळी वळती गावापासून थापलिंग देवस्थान हे तीन चार किलोमीटर अंतरावर असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना यात्रेला जाण्यासाठी कठीण होते. वळती गावातील काटवान वस्ती, गांजवेवाडी या परिसरातून थापलिंग देवस्थान दूरच्या अंतरावर होते. त्यामुळे थापलिंग गडावर जाण्यापासून अनेक जण वंचित राहत होते. यात्रेकरूंची ही गैरसोय टाळण्यासाठी थापलींग गडावरची जिलेबी भजी, शेव रेवडीची हॉटेल , खेळणी, बांगड्यांची दुकाने ही वळती गावात तिसऱ्या दिवशी येऊ लागली. त्यामुळे हा शिळा बाजार सुरू झाला. तेव्हापासून आजपर्यंत हा बाजार मोठ्या उत्साहात भरतो. आहिल्यानगर, बीड जिल्ह्यातील व्यावसायिक येथे दरवर्षी आवर्जून येतात. या बाजारात महिलांची लहान मुलांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
यंदा पै पाहुण्यांना ग्रामस्थांनी जिलेबी -, शेव -रेवडी आग्रहाने खाऊ घातली. महिलांनी संसारपयोगी साहित्य वस्तू खरेदी केल्या. या शिळ्या बाजारात यंदा लाखो रुपयांची उलाढाल झाली.
चौकट : वळती गावात थापलिंग यात्रेचा उत्साह अधिक: थापलिंग यात्रेचा उत्साह वळती गावात पूर्वीपासून अधिकच दिसून येतो. आजही आपली गडावर ओळखीच्या काठी पालख्यांना मोठा मान दिला जातो. सर्व मुंबई, पुणेकर मंडळी आवर्जून या यात्रेसाठी हजेरी लावतात.

वळती (ता. आंबेगाव) गावात शिळ्या बाजाराची आजही परंपरा टिकून आहे.

Continue Reading

गावागावातुन

थापलिंग देवस्थान विकासासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार: माजी मंत्री दिलीप वळसे पाटील

Published

on

पारगाव :

श्री. क्षेत्र थापलिंग देवस्थान विकासासाठी या पूर्वकाळात मी आमदार निधी, तीर्थक्षेत्र विकास निधी उपलब्ध करून दिला. त्यातून थापलिंग गडावर विविध विकास कामे झाली. थापलिंग देवस्थान विकासासाठी जाहीर केल्याप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भागविकास निधीतून ५० लाख रुपयांचा निधी थापलिंग देवस्थान ट्रस्टकडे वर्ग केला आहे. पुढच्या यात्रेपर्यंत आणखी ५० लाख रुपयांचा निधी मी राज्यशासन, इतर निधीतून उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि.४) दिली.
नागापूर (ता.आंबेगाव) येथील श्री.क्षेत्र थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आमदार दिलीप वळसे पाटील यांनी खंडोबा देवाचे दर्शन घेऊन तळीभंडार केला. त्यानंतर बैलगाडा घाटात गेल्यावर यात्रेकरूंना शुभेच्छा देताना वळसे पाटील बोलत होते.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले”मी भाग्यवान आहे. लहानपणापासून थापलिंग यात्रेला मला येण्याची संधी मिळाली. गेल्या वर्षी यात्रेत थापलिंग देवस्थान विकास कामांसाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भागविकास निधीतून ५० लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. भीमाशंकर कारखान्याने थापलींग देवस्थान ट्रस्टकडे हा निधी वर्ग केला आहे. थापलिंग गडावर आणखी विकास कामांसाठी मोठ्या निधीची गरज आहे. पुढच्या यात्रेपर्यंत आपण राज्य शासनाच्या माध्यमातून आणखी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहोत. याशिवाय थापलिंग देवस्थानासाठी जेव्हा जेव्हा जी मदत लागेल. ती मदत प्राधान्याने केली जाईल.
याप्रसंगी थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने वळसे पाटील यांचा सत्कार देवस्थान ट्रस्टचे सचिव डी. एन. पवार यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी विष्णू काका हिंगे भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, सचिन भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य तुलसी भोर, पंचायत समितीच्या माजी सभापती उषा कानडे, अंकिता वाळुंज, सुनंदा ढोबळे आदी मान्यवर, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सरपंच गणेश यादव यांनी केले.

नागापूर (ता.आंबेगाव) येथील श्री. थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Continue Reading
Advertisement

Trending