Connect with us

गावागावातुन

सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात धामणीत म्हाळसाकांत खंडोबा यात्रा सुरु

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी -राजु देवडे


दिः२४/०२/२०२४. धामणी ( ता. आंबेगाव ) ” सदानंदाचा येळकोट,येळकोट येळकोट जय मल्हार ” च्या जयघोषात भंडारा खोबरे उधळून लाखो भाविकांनी धामणी ( ता.आंबेगांव)येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले.

पुणे ,नाशिक व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या येथील म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेला शनिवार ( दिं :२४ ) रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली शनिवारी माघ शुध्द पौर्णिमेला भल्या पहाटे चार वाजता श्री खंडोबाच्या भव्य मूर्तीसमोरील खालच्या भागात असलेल्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक परंपरागत सेवेकरी तांबे व भगत यांंनी केल्यानंतर पहाटे साडेचार वाजता स्वयंभू सप्तशिवलिंगावर साधारण दोन फूट उंच व दिड फूट रुंद व्यासाची सर्वांगसुंदर पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात येऊन खंडोबाच्या मुखवट्याला आणि पूर्वमुखी श्री म्हाळसाकांत खंडोबा ,म्हाळसाई-बाणाई व उत्तरमुखी असलेल्या खंडोबाच्या मानलेल्या बहिणीच्या जोगेश्वरीच्या विशाल देखण्या मूर्तीना वस्रालंकार घालण्यात येऊन त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत खंडोबाची महाआरती करण्यात आल्यानंतर भाविकांना देवाच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

देवस्थानांच्या तांबे,भगत सेवेकरी मंडळीनी आणलेल्या पुरणपोळी,साजूक तूप,दूध व खसखशीची खीर,सार,भात,कुरडई व पापडी या पंचपक्वानांचा नैवेद्य सप्तशिवलिंगाला अर्पण करण्यात आला.यावेळी देवस्थानाचे सेवेकरी भगत,तांबे मंडळी उपस्थित होती.पहाटे दर्शनासाठी महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

देवस्थानातील पारंपारिक धार्मिक विधी पार पडल्यानंतर यात्रोत्सवाला सुरुवात झाली.सकाळी नऊ वाजता गावातील पेठेतून पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत मिरवणूकीने देवाचे हारतुरे व मांडवडहाळे मंदिरात आणण्यात येऊन ते देवाला अर्पण करण्यात आले.शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने पुणे ,भोसरी ,पिंपरी चिंचवड शहरातील व परिसरातील भाविक सकाळपासून दर्शनाला येत होते .पेठेतून नवसाच्या बैलगाड्याची व गाडी बगाडाची डफडे,ढोलकी ,ताशा ,संबळ ,सनई तुतारीच्या पारंपारिक वाद्यात व बँजो व डीजेच्या तालात मिरवणूक काढण्यात आल्या त्यानंतर बैलगाड्याच्या घाटामध्ये नवसाच्या बैलगाड्याच्या शर्यती सुरु झाल्या.

घाटात नवसाचे बैलगाडे पळण्यासाठी पडवळ ,सैद ,आवटे.(महाळूंगे पडवळ)जाधव ,ढगे.(नांदूर)थोरात (बेल्हा पाडळी)गावडे (गावडेवाडी) याशिवाय गाडकवाडी ,पेठ पारगांव ,भराडी ,फाकटे ,टाकळी हाजी यांचे बैलगाडे आलेले होते.बैलगाड्याच्या शर्यती पाहाण्यासाठी बैलगाडा शौकीनानी मोठी गर्दी केलेली दिसत होती.

मंदिर परिसरात भंडारा,खोबरे व पेढे विक्रीची व फुलाची दुकाने दिसत होती.मंदिराच्या शिखरावर व महाद्बारावर पारनेर तालुक्यातील आळे पाडळीच्या थोरात कुटुंबियाच्या तर्फे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.महाळूंगे पडवळ येथील पडवळ कुटुंबियानी मंदिराची व गाभार्‍याची झेंडूच्या फुलांनी सजावट केली होती.मंदिराच्या आवारात भाविकांची पांचनामाची जागरणे सुरु होती.वाघेमंडळी वीर मंडळी जागरणाचे घटापुढे खंडोबाचा पांचनामाचा गजर करताना दिसत होती. पंचक्रोशीच्या गावांमधील भाविक सहकुटुंब देवघरातील टाकाचे देव ताम्हणात आणून खंडोबाचा भंडारा व खोबरे उधळून ‘ सदानंदाचा येळकोट ‘ करुन तळीभंडार करत होती.

यात्रेनिमित्त निरनिराळ्या ठिकाणाहून हाँटेल,आईस्क्रीम पार्लर,जनरल कटलरी , खेळणीची दुकाने , सौदर्य प्रसाधने ,गृहोपयोगी वस्तू कृषी उपयोगी लाकडी व लोंखडी अवजारे निरनिराळे फॅशनेबल कपडे,बेडशीटची दुकाने थाटलेली होती.दुपारी बारा नंतर देवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या.दुचाकी व चारचाकी वाहानाने येणार्‍याची संख्या मोठी होती.माही पुनवेच्या पालखी ढोललेझीमच्या निनादात व फटाक्याच्या आतषबाजीत काढण्यात आली.पालखीला भाविकांनी गर्दी केलेली होती.यात्रेची व्यवस्था देवस्थान,यात्रा उत्सव समिती ,ग्रामपंचायत आणि गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते व पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

Published

on

मंचर-

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

 पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत. 

    निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
Continue Reading

गावागावातुन

शिळा बाजार” ठरतोय वळती गावच्या सांस्कृतिक ओळखीचा भागयंदा शिळ्या बाजारात झाली लाखोंची उलाढाल.

Published

on

पारगाव :

वळती (ता.आंबेगाव) गावात स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली शिळ्या बाजाराची ही परंपरा पिढ्यान्‌पिढ्या जपत ग्रामस्थांनी आजपर्यंत टिकवून ठेवली आहे. आधुनिक काळातही गावच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असलेला हा शिळा बाजार वळती गावाची खास ओळख ठरत आहे. परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक सलोखा जपत भरवला जाणारा हा शिळा बाजार पाहण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिकही आवर्जून उपस्थित राहत आहेत.


पौष पौर्णिमेला नागापूर येथील थापलिंग गडावर दोन दिवस खंडोबा देवाची यात्रा भरते. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी वळती गावात हा शिळा बाजार भरतो. पूर्वीचा काळी वळती, नागापूर या दोन गावांची वळती ग्रामपंचायत एकच होती. त्यामुळे थापलिंग देवस्थान हे वळती ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत होते. त्यावेळी वळती गावापासून थापलिंग देवस्थान हे तीन चार किलोमीटर अंतरावर असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना यात्रेला जाण्यासाठी कठीण होते. वळती गावातील काटवान वस्ती, गांजवेवाडी या परिसरातून थापलिंग देवस्थान दूरच्या अंतरावर होते. त्यामुळे थापलिंग गडावर जाण्यापासून अनेक जण वंचित राहत होते. यात्रेकरूंची ही गैरसोय टाळण्यासाठी थापलींग गडावरची जिलेबी भजी, शेव रेवडीची हॉटेल , खेळणी, बांगड्यांची दुकाने ही वळती गावात तिसऱ्या दिवशी येऊ लागली. त्यामुळे हा शिळा बाजार सुरू झाला. तेव्हापासून आजपर्यंत हा बाजार मोठ्या उत्साहात भरतो. आहिल्यानगर, बीड जिल्ह्यातील व्यावसायिक येथे दरवर्षी आवर्जून येतात. या बाजारात महिलांची लहान मुलांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
यंदा पै पाहुण्यांना ग्रामस्थांनी जिलेबी -, शेव -रेवडी आग्रहाने खाऊ घातली. महिलांनी संसारपयोगी साहित्य वस्तू खरेदी केल्या. या शिळ्या बाजारात यंदा लाखो रुपयांची उलाढाल झाली.
चौकट : वळती गावात थापलिंग यात्रेचा उत्साह अधिक: थापलिंग यात्रेचा उत्साह वळती गावात पूर्वीपासून अधिकच दिसून येतो. आजही आपली गडावर ओळखीच्या काठी पालख्यांना मोठा मान दिला जातो. सर्व मुंबई, पुणेकर मंडळी आवर्जून या यात्रेसाठी हजेरी लावतात.

वळती (ता. आंबेगाव) गावात शिळ्या बाजाराची आजही परंपरा टिकून आहे.

Continue Reading

गावागावातुन

थापलिंग देवस्थान विकासासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार: माजी मंत्री दिलीप वळसे पाटील

Published

on

पारगाव :

श्री. क्षेत्र थापलिंग देवस्थान विकासासाठी या पूर्वकाळात मी आमदार निधी, तीर्थक्षेत्र विकास निधी उपलब्ध करून दिला. त्यातून थापलिंग गडावर विविध विकास कामे झाली. थापलिंग देवस्थान विकासासाठी जाहीर केल्याप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भागविकास निधीतून ५० लाख रुपयांचा निधी थापलिंग देवस्थान ट्रस्टकडे वर्ग केला आहे. पुढच्या यात्रेपर्यंत आणखी ५० लाख रुपयांचा निधी मी राज्यशासन, इतर निधीतून उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि.४) दिली.
नागापूर (ता.आंबेगाव) येथील श्री.क्षेत्र थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आमदार दिलीप वळसे पाटील यांनी खंडोबा देवाचे दर्शन घेऊन तळीभंडार केला. त्यानंतर बैलगाडा घाटात गेल्यावर यात्रेकरूंना शुभेच्छा देताना वळसे पाटील बोलत होते.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले”मी भाग्यवान आहे. लहानपणापासून थापलिंग यात्रेला मला येण्याची संधी मिळाली. गेल्या वर्षी यात्रेत थापलिंग देवस्थान विकास कामांसाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भागविकास निधीतून ५० लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. भीमाशंकर कारखान्याने थापलींग देवस्थान ट्रस्टकडे हा निधी वर्ग केला आहे. थापलिंग गडावर आणखी विकास कामांसाठी मोठ्या निधीची गरज आहे. पुढच्या यात्रेपर्यंत आपण राज्य शासनाच्या माध्यमातून आणखी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहोत. याशिवाय थापलिंग देवस्थानासाठी जेव्हा जेव्हा जी मदत लागेल. ती मदत प्राधान्याने केली जाईल.
याप्रसंगी थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने वळसे पाटील यांचा सत्कार देवस्थान ट्रस्टचे सचिव डी. एन. पवार यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी विष्णू काका हिंगे भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, सचिन भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य तुलसी भोर, पंचायत समितीच्या माजी सभापती उषा कानडे, अंकिता वाळुंज, सुनंदा ढोबळे आदी मान्यवर, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सरपंच गणेश यादव यांनी केले.

नागापूर (ता.आंबेगाव) येथील श्री. थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Continue Reading
Advertisement

Trending