गावागावातुन
स्वातंत्र्यपूर्वीची ” शिळ्या बाजाराची ” परंपरा आजही वळतीत टिकून यंदा महिलांची गर्दी वाढून लाखोंची उलाढाल झाली .
मंचर :
वळती (ता.आंबेगाव) गावात स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेला “शिळा बाजार ” आजही सुरुच आहे.यंदा शिळ्या बाजारात महिलांची मोठी गर्दी होऊन लाखो रुपयांची उलाढाल झाली
पौष पोर्णिमेला थापलिंग यात्रा दोन दिवस भरते.त्यानंतर तिसऱ्याच दिवशी वळती गावात हा बाजार भरतो. या बाजारात थापलिंग गडावरचीच हॉटेल, खेळणीची दुकाने, पाळणे वळती गावात लावले जातात. त्यामुळे या बाजाराला “शिळा बाजार ” नाव पडले.
पूर्वीच्या काळात वळती गाव व परिसरातील महिला, जेष्ठ नागरिकांना थापलिंग देवस्थान हे वळती गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्याने त्याकाळात वाहन व्यवस्था नव्हती. यात्रेला पायी जाणे कठीण होते.यात्रेत खरेदी -विक्री, पाहुण्यांना पाहुणचार करता येत नव्हता. ही गैरसोय दूर व्हावी. यासाठी थापलिंग गडावरची यात्रेला आलेली दुकाने ही तिसऱ्या दिवशी वळती गावात येऊ लागली. तीच परंपरा आजही टिकून आहे.या शिळ्या बाजारात दिवसेंदिवस गर्दी वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
श्री .क्षेत्र . थापलिंग देवस्थान हे पूर्वी वळती गावच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत होते.परंतू त्यानंतर स्वतंत्र नागापूर ग्रामपंचायत झाल्याने देवस्थान हे नागापूर गावच्या हद्दीत गेले.परंतू आजही थापलिंग यात्रेत जावून वळती गावातील काठी पालख्यांना मोठा मान आहे. थापलिंग यात्रेचा उत्साह आजही वळती गावात मोठा दिसून येतो.
यंदा या शिळ्या बाजारात महिलांची गर्दी तुलनेने अधिक दिसून आली.जिलेबी भजी,शेव रेवडीची हॉटेल, बांगड्या, खेळणीची दुकाने, रसवंतीगृहे, घरगुती, संसारपयोगी, शेतीपयोगी साहित्याची दुकाने मोठ्या प्रमाणावर दाखल झाली होती.बाजारात संगमनेर, बीड, नगर, शिरूर या भागातील व्यवसायिक दाखल झाले होते.वळती ग्रामस्थांनी त्यांना महादेव मंदिर पटांगणात जागा उपलब्ध करून दिली.
वळती(ता.आंबेगाव)गावात स्वातंत्र्यपूर्वी सुरू झालेला “शिळा बाजार “आजही सुरूच आहे.शिळ्या बाजारात दुकाने व महिलांची झालेली गर्दी.