गावागावातुन

लाखनगाव वनक्षेत्रात अवैध मुरूम उत्खनन; जेसीबी जप्त

Published

on

मंचर-

लाखनगाव येथील वनक्षेत्रातील फॉरेस्ट कंपार्टमेंट क्र. २५२ मध्ये रात्रीच्या सुमारास विनापरवाना प्रवेश करून जेसीबीच्या सहाय्याने मुरूम उत्खनन सुरू असल्याची घटना वन विभागाच्या पथकाने उघडकीस आणली.

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १.१५ वाजता वन विभागाचे पथक नियत क्षेत्रात गस्त व तपासणी करीत असताना वनक्षेत्रात जेसीबी मशीनच्या सहाय्याने मुरूम उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. पथकाने तात्काळ कारवाई करत सदर जेसीबी मशीन ताब्यात घेतले. यावेळी जेसीबी चालक घटनास्थळावरून फरार झाला.

घटनास्थळी पंचनामा करून जप्त करण्यात आलेले जेसीबी मशीन सुरक्षिततेच्या दृष्टीने वनपरिक्षेत्र कार्यालय, मंचर येथे आणून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सदर जेसीबी मशीन हे राजेश रमेश गडकर, रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या मालकीचे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. वनक्षेत्रातील मुरूमाचे विनापरवाना उत्खनन करून त्याची वाहतूक व विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांविरुद्ध वन गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर तसेच विकास भोसले वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर यांच्या मार्गदर्शनाखाली नीलम चव्हाण वनपाल धामणी; पूजा कांबळे वनरक्षक लाखनगाव, अशोक जाधव व रामदास वळसे, बिबट शीघ्र कृती दल, गावडेवाडी यांच्या पथकाने केली.

वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत उत्खनन, अतिक्रमण अथवा अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध वन विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version