महाराष्ट्र
पंढरपुर येथे आषाढी वारीत वाट चुकलेल्या ज्येष्ठ वारकऱ्याला मुस्लिम तरुणाने घरी नेऊन दिला आश्रय.केले कुटुंबाच्या स्वाधीन.
पंढरपुर येथे आषाढी वारीत वाट चुकलेल्या बाळू बाळा शेटे (रा. काठापूर बुद्रुक, ता. आंबेगाव) या ज्येष्ठ वारकऱ्याला अकलूज (जि. सोलापूर) येथील जाकीर हबीब शेख या मुस्लिम तरुणाने घरी नेऊन आश्रय दिला. तसेच, नातेवाइकांचा शोध घेऊन सुरक्षितरित्या कुटुंबाच्या स्वाधीन करून हिंदू-मुस्लिम जातीय सलोख्याचा आदर्श उभा केला.
बाळू बाळा शेटे (वय ६२) हे आषाढी वारीसाठी शनिवारी (ता. ५) गावातील ग्रामस्थांसोबत पंढरपूर येथे गेले होते. रविवारी (ता. ६) ते महाद्वार घाट पंढरपूर येथे असलेल्या मोठ्या प्रमाणावरील गर्दीत बेपत्ता झाले. त्यांचा दोन दिवस शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. अखेर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार देण्यात आली. त्यांचे छायाचित्र, तसेच वर्णन समाज माध्यमांवर पसरले होते.
दरम्यान, पंढरपूर येथे बरोबर आलेल्या सहकाऱ्यांची चुकामुक झाल्याने बाळू शेटे काहीसे गांगरून गेले.साधा स्वभाव असल्याने त्यांना कुणाला आपण चुकलो आहोत हे ही सांगता आले नाही.ते रस्त्याने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सोबत चालत चालत पुण्याच्या दिशेने निघाले. दोन दिवसांत सुमारे ४५ किलोमीटर अंतर पार करत ते मंगळवारी (ता. ८) सकाळी अकलूजपर्यंत आले. सोबत पायी चालणारे वारकरी कमी झाल्याने त्यांना काही सुचेनासे झाले. त्यामुळे ते बसस्थानक परिसरात चिंताग्रस्त अवस्थेत बसून राहिले. आजूबाजूची लहान मुले त्यांच्या भोवती जमा झाली होती. जवळूनच जाणारे जाकीर हबीब शेख या तरुणाची नजर त्यांच्याकडे गेली. त्यांनी मुलांना बाजूला करून त्यांची विचारपूस केली. मात्र त्यांना जास्त काही सांगता येत नवते ते फक्त काठापूर,घोडनदी, पुणे एवढेच सांगत होते. बाकी त्यांना काही सुचत नव्हते. त्या तरुणाने त्यांना घरी नेले. जेऊ घातले व धीर दिला. तसेच, मोबाईलवर काठापूर,घोडनदी, पुणे या परिसरातील कोणाचा नंबर मिळतो का, याचा शोध घेऊ लागले.दरम्यान, दोन तासानंतर काठापूर परिसरात राहणाऱ्या गणेश काकडे यांचा नंबर जाकीर शेख यांना मिळाला. त्यांनी सापडलेल्या बाबांचे वर्णन त्यांना सांगितले. ‘ते आमच्याच गावातील हरवलेले बाळू शेटे आहेत.’ तसेच, गणेश काकडे यांनी बाळू शेटे यांचा मुलगा प्रवीण शेटे यांना फोन करून सांगितले, ‘तुमचे वडील अकलूज येथे सापडले आहेत.’ त्यांना, त्यांना जाकीर शेख यांचा नंबर
दिला. प्रवीण शेटे रात्रीच ११ वाजता अकलूजला वडिलांना आणण्यासाठी निघाले होते, परंतु जाकीर शेख यांनी सांगितले, ‘रात्र आहे अन् पाऊसही सुरु आहे. तुमचे वडील माझ्या घरात सुरक्षित आहेत. काही काळजी करू नका. आता येऊ नका उद्या सकाळी या.’
दरम्यान, बुधवारी सकाळी प्रवीण शेटे, यशवंत शेटे, नारायण जाधव हे अकलूज येथे जाऊन बाळू शेटे यांना घरी घेऊन आले.
पंढरपूर येथे तातडीने पोलिस तक्रार नोंदवण्यासाठी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील, पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांचे सहकार्य लाभले.