गावागावातुन

नवजात वासरांचा प्रश्न गंभीर अनेक ठिकाणी सोडलेल्या या वासरांचा अन्नपाण्याविना मृत्यू.

Published

on

मंचर-आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील गावांमध्ये सध्या जर्शी गायींचे वासरे गोर्हे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला ओढ्याच्या कडेला वनविभागाच्या जागेत सार्वजनिक गायरान जागेत अशा अनेक ठिकाणी सोडले ले पहावयास मिळत असून या वासरांना नविन प्रश्न उभा राहिला असुन अन्नपाण्याशिवाय ओरडणारी ही वासरे मन सुन्न करत असुन याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

तालुक्याच्या पुर्व भागातील काठापूर बुद्रुक लाखनगाव जारकरवाडी देवगाव पोंदेवाडी या परिसरात वनविभागाच्या हद्दीत, ओढ्यानाल्यांच्या कडेल रस्त्यावर तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या पडीक क्षेत्रात लहान वासरे मोकाट स्वरूपात सोडली जात आहेत. खायला पुरेसे अन्न न मिळाल्याने या वासरांचा मृत्यू होत असून काही वासरे कुत्र्यांच्या भक्षस्थानी पडत आहेत. ही वासरे मेल्यानंतर त्यांचा दुर्गंध वास येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व स्थानिकांना सहन करावा लागत आहे. या प्रकाराला नक्की जबाबदार कोण हा प्रश्न उभा राहिला आहे.

मोकाट सोडलेली वासरे मोकाट कुत्र्यांच्या भक्षस्थानी पडत आहेत.मात्र शिल्लक राहिलेले वासरू कुत्र्यांनी न खाल्ल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत आहे.ज्याचा थेट परिणाम स्थानिकांच्या आरोग्यावरती होतो आहे. तसेच मोकाट कुत्र्यांना खायला काहीही न मिळाल्यानंतर ते स्थानिक शेतकऱ्यांच्या वासरांवरती, शेळ्यांवरती हल्ला चढवत आहेत. आधीच या परिसरात बिबट्याचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य व वावर आहे. त्यात आलेले हे नवीन संकट या परिसरातील शेतकरी व स्थानिक रहिवासी यांच्या पुढे उभे आहे.

याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी स्थानिक शेतकरी व रहिवासी यांच्या पुढे आहे.महाराष्ट्र शासनाने गोहत्त्या बंदी कायदा लागू केल्यापासून मोठ्या प्रमाणावर लहान वासरे भाकड गाई यांचा प्रश्न ग्रामीण भागातील शेतकर्यांपुढे उभा राहिला आहे.कायदा लागू झाल्यापासून भाकड जनावरांची मागणी पूर्णपणे थांबली आहे.यामुळे दुध न देणाऱ्या गाई त्याचप्रमाणे नवीन जन्माला आलेली वासरे गोर्हे यांचं करायचं काय हा प्रश्न उभा राहिला आहे.सध्या अनेक शेतकरी नवीन जन्माला आलेले गोर्हे आडमार्गी रस्त्याच्या कडेला,जंगलात सोडून देत आहेत.परंतु ही वासरे अन्न पाण्याशिवाय ओरडून ओरडून आपला जीव सोडत आहेत.त्यामुळे माणूस किती स्वार्थी झाला आहे हे दिसून येते. शासनाने गोहत्या बंदी कायदा केला परंतु यावर उपाययोजना कुठल्याही प्रकारची केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे उत्पादन न देणारी ही जनावर सांभाळण्यासाठी शासनाने पांजरपोळ गोशाळा सुरू केल्या पाहिजे व शेतकऱ्यांनी सांभाळण्यासाठी अवघड झालेली गाई गोरे यांची स्वतंत्र व्यवस्था उभी केली पाहिजे.
सध्या दुधाला बाजार भाव नाही त्यामुळे शेतकरी आधीच वैतागला आहे. एकंदरीतच दुधाचे होणारे उत्पन्न यातून मिळणारे पैसे व या जनावरांवर येणारा खर्च पाहतात शेतकऱ्यांचे हाती काही लागत नसून.अशा परिस्थितीत ही भाकड जनावरे सांभाळताना आधीक खर्च होत असल्याने. अनेक शेतकऱ्यांनी गोठे बंद करून गाय विकल्या आहेत.सध्या गायी विकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चांगली गायी सुद्धा अल्प किमतीला विकली जात आहे. शेतकरी गोठे मोकळे करत असल्याचे प्रमाण वाढले आहे.शासनाने गोहत्याबंदी कायदा करून नक्कीच गोवंशाचे संरक्षणाचे काम केले की गोवंश नष्ट करण्याकडे पाऊल उचलले हा प्रश्न उभा आहे.
शासनाने केलेला हा कायदा नक्कीच कुठेतरी फसला असल्याचेही काही शेतकरी सांगत आहेत. एकंदरीतच शासनाने कायदा करत असताना हा कायदा केल्यावर निर्माण होणार्या प्रश्नांचा विचार करुन उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु असला कुठलाही मार्गा न काढता कायदा केला आणि त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहीले आहेत.
सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये असनारी लहान वासरांची परिस्थिती पाहता भयानक स्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version