गावागावातुन
बेल्हे ते रांजणी या मार्गावर बिबट्याच्या दहशतीमुळे जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास.या रस्त्यावर दुचाकीस्वारांवर वाढले बिबट्यांचे हल्ले.
मंचर :-आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बेल्हे ते रांजणी मार्गे मंचर या रस्त्यावर रात्रीचा बिबट्यांच्या दहशतीमुळे प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे.या रस्त्यावर आता दुचाकीस्वारांवर बिबट्यांचे हल्ले आता वाढले आहेत.
बेल्हे ते मंचर हा तालुक्याच्या पूर्व भागातील महत्त्वाचा रस्ता आहे.या रस्त्यावरून सतत लहान मोठ्या वाहनांची वर्दळ असते.रस्त्यामध्ये गांजवेवाडी, रांजणी, थोरांदळे, खडकी, चांडोली परिसरात रस्त्यांच्या कडेला दाट झाडी,जंगल आहे. हा परिसर बिबट प्रवण क्षेत्रात मोडतो.या रस्त्यावर यापूर्वी अनेक दुचाकीस्वारांवर बिबट्यांनी हल्ले करून त्यांना जखमी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. नुकतीच शनिवारी (दि.१८ )सायंकाळी साडेसात वाजता कमलेश जाधव या दुचाकी स्वरावर बिबट्याने हल्ला केला. त्याच्या डाव्या पायावर बिबट्याने पंजा मारून त्याला जखमी केले.
रस्त्यात खडकी फाट्या नजिक दाट जंगल आहे . येथे मनुष्य वस्ती नाही. उसाचे क्षेत्र अधिक आहे.त्यामुळे रात्रीच्या वेळी बिबटे अनेकदा दिसतात.थोरांदळे गावाच्या हद्दीत डोंगर मळा येथे रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी आहे. पुढे रांजणी , गांजवेवाडी नजिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल आहे.भागातील अनेक नागरिक मंचर येथे नोकरीला आहेत.या भागात एसटी बस सेवा बंद आहेत. मुक्कामी एसटी कधी तरीच येते.त्यामुळे नागरिकांना दुचाकीचाच वापर करावा लागतो.
सध्या या परिसरात ऊस तोड वेगात सुरू आहे.त्यामुळे बिबटे सैरभैर झाले आहेत.रात्रीच्या वेळी ते शिकारीसाठी बाहेर पडतात.त्यामुळे या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी प्रवास जीव मुठीत धरुन करावा लागत आहे