गावागावातुन
डिंभे उजव्या कालव्याला पाणी आल्याने शेतकरी समाधानी
लोणी धामणी-डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) यातून डिंभा उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील 50 गावांना फायदा होणार असून .सुकू लागलेल्या शेती पिकांना जीवनदान मिळणार आहे.त्यामुळे येथील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आंबेगाव तालुक्यात असणारे डिंभे धरण हुतात्मा बाबू गेनू जलाशय व या जलाशयात साठणाऱ्या पाण्यावर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील शेती पिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड या तालुक्यांना व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथपर्यंत या धरणाच्या पाण्यावर शेतीला पाणीपुरवठा केला जातो.डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डिंभे पासून तर खडकवाडी पर्यंत व शिरूर तालुक्यातील सविंदने पासून सोने सांगवी पर्यंतच्या गावांना पाणीपुरवठा होत असतो. त्याचप्रमाणे डाव्या कालव्यावर आंबेगाव तालुक्यातील व जुन्नर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा होतो.तर डाव्या कालव्यातून हे पाणी येडगाव धरणात जाऊन तेथून ते अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांना ही जात असते. सध्या डिंभे धरणाच्या उजव्या कालव्या खालील गावांमध्ये शेती पिकांना पाणी टंचाई निर्माण झाली होती.अनेक शेती पिके पाण्याअभावी सुकू लागली होती.तळी ओढे आटले होते. त्यामुळे या भागातील शेतकरी डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे अशी मागणी करत होता.हि मागणी मान्य करून डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला सध्या पाणी सोडण्यात आले असून. या पाण्याचा फायदा उजवा कालव्याच्या खाली असणाऱ्या 50 गावांच्या शेती पिकांना होणार आहे. तसेच विहिरींची पाणी पातळीत वाढ झाल्याने याचा फायदा पुढील अनेक दिवस होणार आहे .त्यामुळे डिंभे धरनाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.