गावागावातुन
शिरदाळे घाटात बिबट्याची दहशत.प्रसंगावधाणामुळे बिबट्याचा हल्ला फसला
निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे
आंबेगावच्या पूर्व भागात दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढतच चालली असून आता ही भीती डोंगरावर असलेल्या शिरदाळे परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. बिबट्या फक्त ऊस प्रवण क्षेत्र आणि जास्त दडन असलेल्या परिसरात पाहायला मिळत होता परंतु आता बिबट मानव वस्तीकडे वाटचाल करू लागला आहे. पूर्व आंबेगावात बिबट्याचा संख्येत वाढ झाली असून तो अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
….अन् बिबट्याने धूम ठोकली
बुधवार ( दि. २४ ) रोजी रात्रीच्या नऊच्या सुमारास शिरदाळे धामणी घाटात घरी जात असताना शिरदाळे मा.उपसरपंच मयुर सरडे आणि राजू चौधरी यांच्या गाडीवर बिबट्या हल्ला करण्याचा तयारीत असताना राजू चौधरी यांच्या प्रसंगावधान आणि मयुर सरडे यांनी त्यांच्या डोळ्यावर गाडीची लाईट लावल्याने बिबट्याची झेप फसली व बिबट्याने दरीच्या बाजूला धूम ठोकली. अगदी चार पाच फुटांवरून हा बिबट्या या दोघांनी पाहिल्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या आठ नंतर दूध घालणारे शेतकरी,कामगार वर्ग यांचे ये जा या रस्त्याने असते त्यामुळे त्यांच्यात देखील भीती निर्माण झाली आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून काळजी घेण्याची गरज असून वनविभागाने देखील काही तरी उपाय योजना करण्याची गरज आहे. रस्त्याने घाट परिसरात हॉर्न वाजवून गाडी चालवावी तसेच रात्रीच्या वेळी गाडीचे इंडिकेटर देखील चालू असावेत असे राजु चौधरी यांनी सांगितले
रात्रीचा प्रसंग खूपच भीतीदायक होता. गेली दहा वर्षे या रस्त्याने मी रोज ये जा करत असतो परंतु इतर जंगली प्राणी बऱ्याचदा पाहायला मिळत होते. परंतु बिबट्याचे दर्शन प्रथमच एवढ्या जवळून झाले आहे. प्रत्येकाने घाटातून जाताना आपली काळजी घेऊन जावे. सोबतीला कोणी तरी घेऊन प्रवास करावा. बिबट्याचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय असून वनविभागाने यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. शिरदाळे परिसरात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या वाढत चालली असून जनावरे सांभाळणारे शेतकरी भीतीच्या छायेत असतात. जंगल परिसर घनदाट झाल्यामुळे त्यांना लपण्यासाठी मुबलक जागा आहे.
श्री.मयुर सरडे
(मा.उपसरपंच शिरदाळे)