गावागावातुन
विठ्ठलवाडी ता.आंबेगाव येथे अवतरला वैष्णवांचा मेळा.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परीषद प्राथ.शाळा विठ्ठलवाडी (ता . आंबेगाव ) येथेे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीसह अनेक साधुसंतांच्या वेशभूषा साकारत दिंडी सोहळ्यात सहभाग घेऊन ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘सौर ऊर्जेचा वापर करा’, ‘पर्यावरण वाचवा देश वाचवा’, ‘स्वच्छता तेथे देवता’ असे अनेक सामाजिक संदेश देत विठू माऊलींचा नामघोष केला.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे विठू माऊली.आणि आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या वैष्णवांचा मेळाच.आणि हा मेळा आज विठ्ठलवाडीत साकार झाला होता.या दिंडी सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापिका मधुरा वैष्णव व सहशिक्षिका श्रीमती मृणाली झुंजार यांनी केले होते.या बालचमुंच्या दिंडीचे सर्व ग्रामस्थ, महिला यांनी फुलांच्या व रांगोळ्यांच्या पायघड्या घालून औक्षण करून स्वागत केले. मुलांना यावेळी खाऊ वाटप केला. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत तसेच सर्व संस्था तसेच सर्व ग्रामस्थ या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.