गावागावातुन
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
सध्या कांद्याच्या बाजारभावाने चांगलीच उसळी घेतली आहे. याच कारणातून बराकीत साठवून ठेवलेल्या कांद्याची चोरी जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथे झाली.
धामणी येथील शेतकरी बाळासाहेब बढेकर यांची कांद्याची वखार जारकरवाडी हद्दीत बढेकरवस्ती नजीक कॅनोल जवळ आहे. ( दि. १४ ) रोजी रात्रीच्या सुमारास कांद्याच्या साधारण ४० ते ५० पिशव्या चोरीला गेल्या असून चालु बाजार प्रमाणे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी बढेकर यांनी सांगितले. मागील काळात कांद्याला बाजारभाव नव्हता त्यावेळी शेतकरी उत्पादकांना बाजारात आपला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत होता. त्यावेळी उत्पादन खर्चही वसूल होत नव्हता. आता कांद्याला चांगला बाजारभाव आहे. मात्र, अशा प्रकारच्या चोरीच्या घटनेमुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.
पूर्व आंबेगावात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी उद्योजक संजय बढेकर, ग्रा. पं. सदस्य शामराव बढेकर, सुरेश बढेकर, दिपक विधाटे यांनी केली आहे.