गावागावातुन
जारकरवाडी जिल्हा परीषद शाळेत विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
जारकरवाडी ( ता. आंबेगाव) येथील जिल्हा परीषद शाळेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा काढला होती. भाळी चंदनाचा टिळा लावून मुखी हरिनामाचा जयघोष करत बाल वारकरी अवतरले.वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला.
बाळ गोपाळांच्या स्वरूपात भक्तीमय वातावरणात पालखी सोहळा साजरा झाला. वैष्णवांचा मेळावा भरल्याप्रमाणे शाळेला स्वरूप प्राप्त झाले होते. डोक्यावर टोपी, कपाळी केशरी गंध, गळ्यात टाळ घेतलेले विद्यार्थी, नऊवारीत नटून-थटून डोक्यावर तुळस घेऊन आलेल्या विद्यार्थीनींना पाहून विठ्ठल नामाची शाळा भरल्याचा प्रत्यय आला. या पालखी सोहळ्यात पहिली ते इयत्ता सातवी पर्यंतचे विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
विविध संतांच्या वेशभूषा मुलांनी परिधान केल्याने भक्तीमय वातावरणात सोहळा साजरा झाला. दिंडी, पालखी व वारकरी असा रंगतदार पालखी सोहळा व विठू-नामाच्या जयघोषात बालगोपाळांनी परिसर दुमदुमून गेला. ग्रामस्थांनी बाल वारकऱ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक म. वि.काळे व सहशिक्षक यांनी सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. अशा भक्तिमय वातावरणात गावात प्रदक्षिणा घालून हरिनामाचा गजर करीत पुन्हा मराठी शाळेच्या प्रांगणात आली.