गावागावातुन
अवसरी खुर्द येथे रस्त्यावर सापडलेला दोन तोळे सोन्याचा गणपती मूळ मालकाला परत. प्रताप हिंगे पाटील यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
अवसरी खुर्द ता.आंबेगाव येथील पत्रकार प्रताप रत्नाकर हिंगे पाटील यांना शनिवार दि. ८ रोजी त्यांच्या दुकानासमोर रस्त्यावर दोन तोळे वजनाचा सोन्याचा गणपती सापडला असता त्यांनी तो प्रामाणिकपणे मूळ मालकाचा शोध घेउन त्यांना परत दिला आहे. पत्रकार हिंगे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की अवसरी खुर्द येथे मुख्य बाजारपेठ रस्त्यावर प्रताप हिंगे यांचे दुकान असुन माजी उपसरपंच दिनेश खेडकर हे कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी हिंगे यांच्या दुकानात आले होते. त्यावेळी गणेश कोष्टी व दिनेश खेडकर यांच्यात चेष्टा मस्करी सुरु असताना गणेश कोष्टी यांच्या गळ्यातील सोन्याच्या गोफ मधील दोन तोळे वजनाचा सोन्याचा गणपती खाली पडला. मात्र ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही त्यानंतर तेथून दोघे निघून गेल्यानंतर काही वेळात प्रताप हिंगे हे दुकान बंद करून कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले असता त्यांना रस्त्यावर सोन्याचा गणपती सापडला. प्रताप हिंगे यांनी मूळ मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळाला नाही. त्यानंतर हिंगे यांनी माजी उपसरपंच दिनेश खेडकर यांना फोन करुण मला सोन्याचा गणपती सापडला आहे. तो तुमचा आहे का? याबाबत विचारले असता त्यांनी गणपती माझा नसल्याचे सांगितले. काही वेळानंतर गणेश कोष्टी यांना गळ्यातील सोन्याचा गणपती गहाळ झाल्याचे समजले असता त्यांनी याबाबत दिनेश खेडकर यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर दिनेश खेडकर यांनी तुमचा सोन्याचा गणपती प्रताप हिंगे यांच्याकडे आहे. घाबरू नका असे सांगितले. त्यानंतर गणेश कोष्टी व दिनेश खेडकर यांनी हिंगे यांच्याशी संपर्क साधत गणपती बाबत माहिती दिली. व प्रताप हिंगे यांनी खात्री करून सदर गणपती गणेश कोष्टी यांच्याकडे सुपूर्द केला. प्रताप हिंगे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गणेश कोष्टी यांनी त्यांना रोख पाच हजार रुपये बक्षीस दिले. पत्रकार प्रताप हिंगे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.