गावागावातुन
पुणे नाशिक औद्योगिक महार्गाला शेतकऱ्यांचा विरोध,योग्य मोबदला मिळाला तरच भुसंपादन – अनिल वाळुंज
निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, खडकवाडी, पोंदेवाडी, काठापूर बुद्रुक, शिंगवे, भागडी आदी गावातुन प्रस्तावित पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्ग आंबेगाव तालुक्यातील सदर गावांमधून जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित गावातील शेतकऱ्यांना जमीन भुसंपादनासाठी अधिसूचना काढली आहे. भुसंपादनाची प्रक्रिया चालू झाली असून शासनाच्या नियमाप्रमाणे मिळत असलेली रक्कम कमी प्रमाणात असल्याचे ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले.
याबाबत राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा झाली असून जि.प.माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व मंत्री वळसे पाटील यांचें स्विय सहायक रामदास वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून आंबेगाव जुन्नर प्रांत गोविंद शिंदे यांच्या सोबत ( दि. ६ जुन ) रोजी भीमाशंकर कारखान्याच्या कार्यस्थळावर बाधीत गावातील शेतकऱ्यांची बैठक होणार आहे ज्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित होणार आहे. अशा शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अनिल वाळुंज यांनी केले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात घोडनदी,व डिंभे धरण उजवा कालवा गेल्याने या भागातील शेती बारमाही पिकत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतीतून चांगले उत्पन्न काढत आहे. या भागातील अनेक जमिनी पुनर्वसनासाठी गेलेल्या आहेत . त्यात कुटुंब विभक्त झाल्याने जमीन कमी झाली आहे. बेल्हा जेजुरी, अष्टविनायक हे दोन्ही महामार्ग या परिसरातून गेले आहे. त्यामुळे या भागातील जमिनींचे दर चाळीस ते पन्नास लाखावर जाऊन पोहचले आहे. या भागातील रेडीरेकनर दर हा अत्यल्प आहे रेडीरेकनरचा दर वाढवल्यास मिळणाऱ्या पैशातून संबंधित शेतकरी दुसरीकडे जमीन घेऊन उदरनिर्वाह करु शकतो त्यामुळे शासनाने रेडीरेकनरचा दर वाढवावा अन्यथा बाधित शेतकऱ्यां समवेत आंदोलन करणार आहे.
अनिल वाळुंज – माजी सरपंच पोंदेवाडी ता.आंबेगाव जि.पुणे.