गावागावातुन
पोंदेवाडी येथील गडदादेवी माता यात्रेच्या निमित्ताने पार पडला कुस्तीचा आखाडा.
निरगुडसर प्रतिनिधी-(राजु देवडे)
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील गडदादेवी माता यात्रा उत्साहात संपन्न झाली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या मल्लांनी चितपट कुस्त्या करून शौकिनांची मने जिंकली. विजेत्या पहिलवांना एकूण ४५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. शेवटची मानाची तीन हजार ५०० रुपयांची कुस्ती निखिल मच्छिंद्र वाघ (पहाडदरा) याने जिंकली
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २७) सकाळी ९ वाजता देवीस चोळी पातळ, शेरणी वाटप व काठी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी चार वाजता झालेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात संपूर्ण पुणे जिल्ह्यातील देहू, शिक्रापूर, मुळशी, मावळ, शिरूर व पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तालमी मधील मल्लांनी चमकदार खेळी करून चितपट कुस्त्या केल्या.
निकाली कुस्ती करणारे पहिलवांना ५१ रुपयांपासून ३५०० रुपयांपर्यंत रोख बक्षिस देण्यात आले. आखाड्याची व्यवस्था खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, उपसरपंच महेंद्र पोखरकर, संदीप पोखरकर, अशोक वाळुंज, नानाभाऊ पोखरकर, संतोष वाळुंज, अर्जुन महाराज वाळूंज, शिवराम पोखरकर, अशोक दुगड, संतोष पोखरकर यांनी पाहिली पंच म्हणून जयसिंग पोंदे, सुशांत रोडे, आनंदा पोंदे, राजु पाबळे यांनी काम पाहिले शेवटची मानाची कुस्ती पैलवान निखिल वाघ (पहाडदरा) व पैलवान थोरात (मंचर) यांच्यात झाली.यावेळी निखिल वाघ याने बाजी मारली.