गावागावातुन
धामणीला मानाच्या काठ्याची मिरवणूक
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
धामणी ( तालुका आंबेगांव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेच्या दुसर्या दिवशी रविवार ( दि.२५) रोजी मानाच्या काठीच्या पारंपारिक “नवसाच्या काठीची मिरवणूक सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडार्याची उधळण करुन मोठ्या उत्साहात काठीचा सोहळा पार पडला.
या पारंपारिक नवसाच्या मानाच्या काठीचे मानकरी समस्त राजगुरु मंडळी (अवसरी खुर्द) पंचरास मंडळी ( संविदणे) घोडे आणि घोडेकर मंडळी (कवठे यमाई)वाळूंज पाटील ( वाळूंजनगर लोणी)आगरकर मंडळी ( पाबळ)नरके मंडळी ( तळेगांव ढमढेरे) आल्हाट मंडळी (येडगाव) येथील नवसाच्या काठीच्या मानकर्याची कुळांनी सहभाग घेतला. या सर्व आडनावांच्या कुळांनी या पारंपारिक सोहळ्याचा वारसा आजतागायत संभाळलेला दिसून येत होता मानाच्या काठीच्या मिरवणूकीची सकाळी आठ वाजता सुरुवात होऊन पहिला काठीचा मान राजगूरु मंडळीच्या मानाच्या काठीला असतो त्यांनी वाजतगाजत व पारंपारिक वाद्याच्या गजरात भंडारा उधळून काठी मल्हार महाद्बाराच्या वरती असलेल्या देवाच्या घोड्याला टेकवण्यात आल्यानंतर सदानंदाचा येळकोटचा मोठा जयघोष करण्यात आला.
मिरवणूकीत फटाक्याची आतषबाजी करण्यात आली मिरवणूकीत महिला भाविकांचा सहभाग लक्षणीय होता सर्व भाविक महिला पिवळ्याधमक भंडार्याने न्हाऊन गेलेले दिसत होते. उत्साह वाखाणण्याजोगा होता त्यानंतर पंचरास.घोडे.घोडेकर.आगरकर.नरके. आल्हाट.वाळूंज पाटील या कुळाच्या मानाच्या काठ्या वाजतगाजत येऊन मानाच्या काठीच्या मिरवणूक सोहळा शांततेत पार पडला खंडोबा देवस्थानाच्या वतीने मानाच्या काठीच्या मानकर्याचा देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश पाटील जाधव.देवस्थानचे सेवेकरी व मुख्य पुजारी दादाभाऊ भगत.सुभाष तांबे.प्रभाकर भगत .पांडुरंग भगत धोंडीबा भगत. माऊली जाधव वाघे.सिताराम जाधव वाघे यांनी मानाचा फेटा श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर पेठेतील पारावर भेदीकाचा कार्यक्रम व मंदिरात पंचक्रोशीतील पंचरास.राजगूरु.गायकवाड.आल्हाट खुडे मंडळीनी कै सदाशिव खूडे पारगांवकर यांचे स्मरणार्थ पारंपारिक वाद्य कार्यक्रमात सहभागी झालेल्या मंडळीचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला पारंपारिक वाद्यामुळे मंदिरात मोठी रंगत आणलेली दिसली वाद्याचे कार्यक्रमास मोठी गर्दी होती वाद्य सोहळ्यात सहभाग घेतलेल्या वाजंत्री मंडळीचा ग्रामस्थाच्या व समस्त पंचरास मंडळीच्या वतीने सत्कार करण्यात आला.