गावागावातुन
सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात धामणीत म्हाळसाकांत खंडोबा यात्रा सुरु
निरगुडसर प्रतिनिधी -राजु देवडे
दिः२४/०२/२०२४. धामणी ( ता. आंबेगाव ) ” सदानंदाचा येळकोट,येळकोट येळकोट जय मल्हार ” च्या जयघोषात भंडारा खोबरे उधळून लाखो भाविकांनी धामणी ( ता.आंबेगांव)येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले.
पुणे ,नाशिक व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या येथील म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेला शनिवार ( दिं :२४ ) रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली शनिवारी माघ शुध्द पौर्णिमेला भल्या पहाटे चार वाजता श्री खंडोबाच्या भव्य मूर्तीसमोरील खालच्या भागात असलेल्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक परंपरागत सेवेकरी तांबे व भगत यांंनी केल्यानंतर पहाटे साडेचार वाजता स्वयंभू सप्तशिवलिंगावर साधारण दोन फूट उंच व दिड फूट रुंद व्यासाची सर्वांगसुंदर पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात येऊन खंडोबाच्या मुखवट्याला आणि पूर्वमुखी श्री म्हाळसाकांत खंडोबा ,म्हाळसाई-बाणाई व उत्तरमुखी असलेल्या खंडोबाच्या मानलेल्या बहिणीच्या जोगेश्वरीच्या विशाल देखण्या मूर्तीना वस्रालंकार घालण्यात येऊन त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत खंडोबाची महाआरती करण्यात आल्यानंतर भाविकांना देवाच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
देवस्थानांच्या तांबे,भगत सेवेकरी मंडळीनी आणलेल्या पुरणपोळी,साजूक तूप,दूध व खसखशीची खीर,सार,भात,कुरडई व पापडी या पंचपक्वानांचा नैवेद्य सप्तशिवलिंगाला अर्पण करण्यात आला.यावेळी देवस्थानाचे सेवेकरी भगत,तांबे मंडळी उपस्थित होती.पहाटे दर्शनासाठी महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
देवस्थानातील पारंपारिक धार्मिक विधी पार पडल्यानंतर यात्रोत्सवाला सुरुवात झाली.सकाळी नऊ वाजता गावातील पेठेतून पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत मिरवणूकीने देवाचे हारतुरे व मांडवडहाळे मंदिरात आणण्यात येऊन ते देवाला अर्पण करण्यात आले.शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने पुणे ,भोसरी ,पिंपरी चिंचवड शहरातील व परिसरातील भाविक सकाळपासून दर्शनाला येत होते .पेठेतून नवसाच्या बैलगाड्याची व गाडी बगाडाची डफडे,ढोलकी ,ताशा ,संबळ ,सनई तुतारीच्या पारंपारिक वाद्यात व बँजो व डीजेच्या तालात मिरवणूक काढण्यात आल्या त्यानंतर बैलगाड्याच्या घाटामध्ये नवसाच्या बैलगाड्याच्या शर्यती सुरु झाल्या.
घाटात नवसाचे बैलगाडे पळण्यासाठी पडवळ ,सैद ,आवटे.(महाळूंगे पडवळ)जाधव ,ढगे.(नांदूर)थोरात (बेल्हा पाडळी)गावडे (गावडेवाडी) याशिवाय गाडकवाडी ,पेठ पारगांव ,भराडी ,फाकटे ,टाकळी हाजी यांचे बैलगाडे आलेले होते.बैलगाड्याच्या शर्यती पाहाण्यासाठी बैलगाडा शौकीनानी मोठी गर्दी केलेली दिसत होती.
मंदिर परिसरात भंडारा,खोबरे व पेढे विक्रीची व फुलाची दुकाने दिसत होती.मंदिराच्या शिखरावर व महाद्बारावर पारनेर तालुक्यातील आळे पाडळीच्या थोरात कुटुंबियाच्या तर्फे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.महाळूंगे पडवळ येथील पडवळ कुटुंबियानी मंदिराची व गाभार्याची झेंडूच्या फुलांनी सजावट केली होती.मंदिराच्या आवारात भाविकांची पांचनामाची जागरणे सुरु होती.वाघेमंडळी वीर मंडळी जागरणाचे घटापुढे खंडोबाचा पांचनामाचा गजर करताना दिसत होती. पंचक्रोशीच्या गावांमधील भाविक सहकुटुंब देवघरातील टाकाचे देव ताम्हणात आणून खंडोबाचा भंडारा व खोबरे उधळून ‘ सदानंदाचा येळकोट ‘ करुन तळीभंडार करत होती.
यात्रेनिमित्त निरनिराळ्या ठिकाणाहून हाँटेल,आईस्क्रीम पार्लर,जनरल कटलरी , खेळणीची दुकाने , सौदर्य प्रसाधने ,गृहोपयोगी वस्तू कृषी उपयोगी लाकडी व लोंखडी अवजारे निरनिराळे फॅशनेबल कपडे,बेडशीटची दुकाने थाटलेली होती.दुपारी बारा नंतर देवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या.दुचाकी व चारचाकी वाहानाने येणार्याची संख्या मोठी होती.माही पुनवेच्या पालखी ढोललेझीमच्या निनादात व फटाक्याच्या आतषबाजीत काढण्यात आली.पालखीला भाविकांनी गर्दी केलेली होती.यात्रेची व्यवस्था देवस्थान,यात्रा उत्सव समिती ,ग्रामपंचायत आणि गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते व पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.