गावागावातुन
थापलिंग यात्रेत पहिल्या दिवशी धावले २५१ नवसाचे बैलगाडे
मंचर प्रतिनिधी-
पौष पोर्णिमेला नागापूर (ता. आंबेगाव ) येथे श्री .क्षेत्र थापलिंग गडावर यात्रेच्या पहिल्या दिवशी २५१ नवसाचे बैलगाडे धावले. यंदा ही टोकन पद्धतीने नवसाचे बैलगाडे सोडले जात आहे. यात्रेच्या दोन दिवसात एकूण ५५१ नवसाचे बैलगाडे धावणार आहेत .अशी माहिती श्री . थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली .
थापलिंग गडावर पौष पौर्णिमेला यात्रेच्या दिवशी दोन्ही दिवस नवसाचे बैलगाडे पळविण्याची जुनी परंपरा आहे. या एकमेव यात्रेत बैलगाडा मालकांना कोणत्याही प्रकारचे बक्षीस दिले जात नाही . केवळ श्रद्धेपोटी बैलगाडा मालक मोठ्या उत्साहात बैल आणून नवसाचे बैलगाडे घाटात सोडतात.बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर यंदा हे दुसरे वर्ष आहे.यंदा दोन दिवसात ५५१ बैलगाड्यांची नोंद झालेली आहे. गुरुवारी ( दि. २५ ) रोजी पहिल्या दिवशी २५१ नवसाचे बैलगाडे धावले.
थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने बैलगाडा घाटाचे दुरुस्ती काम करण्यात आले आहे .घाटाच्या दोन्ही बाजूंच्या कठड्यांची उंची देखील वाढविण्यात आली आहे. थापलिंग घाटात बैलगाडा मालक , शौकीन , यात्रा करूंचे स्वागत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम , नागापूर गावचे सरपंच गणेश यादव व त्यांचे सहकारी स्वागत करत आहेत .