गावागावातुन
लोणी येथे प्राणप्रतिष्ठेनिमित्त कायमस्वरूपी हिंदू धर्मध्वजाची उभारणी.
लोणी-धामणी : प्रतिनिधी
लोणी (ता.आंबेगाव ) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने प्रभू श्रीराम जन्मभूमी श्रीक्षेत्र अयोध्या येथे झालेल्या नवीन मंदिराच्या कलाशारोहण व प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापणानिमित्त कायमस्वरूपी हिंदू धर्म ध्वजाची उभारणी करण्यात आली.
श्रीक्षेत्र अयोध्या येथे होणार्या नवीन मंदिराच्या कलशारोहण व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणानिमित्त विविध धार्मिक कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सावळेराम नाईक यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीच्या वतीने येथील बसस्थानकाजवळ बेल्हे जेजूरी महामार्गालगत कायमस्वरूपी हिंदू धर्मध्वजाची उभारणी करण्यात आली.
यावेळी ध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली.व नंतर बाजार पेठेतून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने कलश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या.यावेळी शोभायात्रेच्या मिरवणूकीत अग्रभागी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भैरवनाथ विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक तसेच कराटे खेळाची प्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होती.
यावेळी लोणी परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.