महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा तमाशा क्षेत्रातील सर्वोच्च “तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर” लोककला जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ तमाशा कलावंत अशोक पेठकर यांना जाहीर.

Published

on

मंचर प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा 2022 सालचा तमाशा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार “तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर” लोककला जीवन गौरव पुरस्कार हा पेठ तालुका आंबेगाव येथील जेष्ठ तमाशा कलावंत
अशोक पेठकर यांना नुकताच जाहीर झाला आहे.


वडिलोपार्जित नाभिक समाजामध्ये जन्म घेतलेल्या अशोकराव क्षीरसागर यांना लहानपणापासूनच शालेय जीवनात नकला आणि नाटकांमध्ये काम करण्याची आवड होती आणि हीच त्यांची आवड पुढे त्यांना तमाशामध्ये अनेक वगनाट्याच्या मध्ये अनेक खलनायकी पात्र साकारताना उपयोगी पडली महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध तमाशा फडात त्यांनी काम केले आहे.

१९७२ साली दादू अवसरीकर सह निवृत्ती पोंदेवाडीकर यांच्या तमाशा फडापासुन सुरू झालेल्या प्रवास विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर, रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर, भिका भीमा सांगवीकर आधी तमाशा फडामध्ये ह्या कलावंताने काम केलेले आहे.
जुन्या काळी ग्रामीण भागामध्ये करमणुकीची जास्त साधने नसायची त्यामुळे यात्रा जत्रांमध्ये असलेले तमाशा आणि त्यातील वगनाट्य हे त्याकाळी प्रमुख लोक करमनुकीचे साधन होते. अशोकरावांच्या खलनाईकी भूमिका म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या हे ठरलेले समीकरण असायचे. साडेपाच फुटापेक्षा जास्त उंची असलेला हा लोककलावंत भारदस्त शरीर भव्य कपाळ आणि भेदक नजर सरळ नाक व गोरा वर्ण आणि नैसर्गिक आवाज लाभलेला कलावंत आज वयाच्या सत्तरी मध्ये आहे.आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे विविध व्याधी आणि आजार यांना हा लोक कलावंत तोंड देत आहे.

हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सातगाव पठार भागातून अशोकरावांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, रघुवीर खेडकर यांसह विविध क्षेत्रातील लोकांनी पुरस्कार जाहीर झाल्यामुळे अशोकरावांचे कौतुक केले आहे .जीवनातील ५० ते ६० वर्षे केलेली लोककलेची सेवा आज सुद्धा त्यांचा धाकटा मुलगा निलेश पुढे चालवताना दिसून येत असून मोठा मुलगा विनायक वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय करत आहे.सध्या सर्वच क्षेत्रातील लोकांकडुन अशोक पेठकर यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version